अहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील माहुली शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहूली शिवारातील नवीन घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.
मळकट कपडे व राखाडी रंगाचा स्वेटर या इसमाच्या अंगात असून तो अंदाजे 40 ते 45 वर्षे वयाचा आहे. सकाळच्या वेळेस दूध घालणार्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी डोळासणे गावचे पोलीस पाटील राजेंद्र सुर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली.
पोलीस पाटील सूर्यवंशी यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र, त्या इसमाची ओळख पटली नाही. याबाबतची माहिती घारगांव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलीस पाटील सूर्यवंशी यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.