अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर- एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील चास शिवारात ही घटना उघडकीस आली आहे.

परिसरात जवळच महिलेचे कपडे, मंगळसूत्र आढळून आल्याने हा मृतदेह महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरलेले असल्याने व काही प्राण्यांनी या मृतदेहाचे लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागेत पडलेला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चास शिवारात महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर आतील डोंगराळ भागात साहेबराव लक्ष्मण गावखरे यांच्या शेतात सुमारे २५ ते ३० गुंठे जागेत मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती तेथील पोलिस पाटील रमेश मुरलीधर रासकर यांनी शनिवारी सकाळी पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, संदीप ढाकणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

नगर ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर मृतदेह २५ ते ३० गुंठे मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच जवळच महिलेचे कपडे, केस, मंगळसूत्र, डोक्याची कवटी पोलिसांना आढळून आली. सुमारे ३० ते ३५ वर्षे वयाचा हा मृतदेह असावा. मृतदेहाच्या तुकड्यांचे प्राण्यांनी लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागी पडलेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

सदरचा प्रकार हा घातपात असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. मृतदेहाची ओळखही अद्याप पटलेली नाही. सदर मृतदेहाचे तुकडे उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button