अहमदनगर ब्रेकींग: डॉ. वैद्य यांच्या फ्लॅटवर दरोडा टाकणारे पकडले

अहमदनगर- येथील डॉ. अरूण जगन्नाथ वैद्य (वय 58 रा. वर्धमान रेसिडेन्सी, टिळक रोड, मुळ रा. कोर्ट गल्ली, नगर) यांच्या फ्लॅटवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. लवकरच दरोड्याचा गुन्हा उघडकीस येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहा दरोडेखोरांच्या टोळीने 15 फेब्रुवारी रोजी पहाटे डाॅ. वैद्य यांचे फ्लॅटवर दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी तब्बल 28 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 10 लाख रूपये रोख रक्कम चोरून नेली होती.
सहा दरोडेखोरांनी डॉ. वैद्य यांचा टिळक रोडवरील पटेल मंगलकार्यालयाच्या मागे वर्धमान रेसिडेन्सीत असलेला फ्लॅट फोडून लोखंडी रॉड, कोयताने दहशत करून सुमारे 21 लाखांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी सहा दरोडेखारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे.
स्थानिक व्यक्तीने दिलेल्या खबरीनुसार बाहेरील टोळीने हा दरोडा टाकल्याचे समोर येताच कोतवालीने दोघांना तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांच्या साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
साथीदारांचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान स्थानिक तिघांनी बाहेरील जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीला टिप दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतर त्या टोळीने हा दरोडा टाकला असल्याचा अंदाज आहे. पोलीस त्यादृष्टीकोनातून तपास करत आहेत. लवकरच त्यांना आणखी दरोडेखोरांना अटक करण्यात यश येईल, असे सूत्रांनी सांगितले.