अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ पतसंस्थेच्या माजी संचालकाला अटक; कारण…

अहमदनगर- रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा गैरव्यवहारप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

 

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माजी संचालक शेख नसिर अब्दुल्ला (वय 53 रा. झेंडीगेट) याला काल बुधवारी झेंडीगेट परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. आज (गुरूवार) त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तो सन 2000 ते 2005 मध्ये संचालक होता.

 

या दाखल गुन्ह्यात तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठेविदार इस्माईल गुलाब शेख यांनी फिर्याद दिलेली आहे.

 

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केलेली आहे. त्यांच्याविरूध्द सुमारे 1500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून शेख नसिर अब्दुल्ला पसार झाला होता.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन शेख यांच्या पथकातील पोलीस अंमलदार दीपक गाडीळकर, योगेश घोडके, नियाज शेख, अनिता तारडे यांनी शेख याला झेंडीगेट परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button