अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: न्यायाधीशांची ‘या’ पोलीस निरीक्षकांवर कारवाई

अहमदनगर- अजामीनपात्र वॉरंट बजावले नसल्याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी नगरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती फिर्यादीचे वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी दिली.

 

आरोपीस अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचा आदेश देऊनही ते वारंट बजावले नसल्याने अहमदनगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम ए देशमुख यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना ही कारणे दाखवा नोटीस जारी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

याबाबतची अ‍ॅड. लगड यांनी दिलेली माहिती अशी की, मौजै लक्ष्मीवाडी, टाकळीभान ता.श्रीरामपूर येथील संजय लक्ष्मण गोल्हार याने त्याचा मित्र भाऊसाहेब गांधी दर्गे (फिर्यादी) याच्याकडून त्याच्या भावासाठी मेडिकल दुकान टाकायचे म्हणून दीड लाख रुपये हात उसने घेतले. ते वेळोवेळी मागणी करूनही परत न देता त्या रकमेचा धनादेश फिर्यादी यांना दिला.

 

पण तो खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही या कारणाने न वटता परत आल्याने फिर्यादीने आरोपीस कायदेशीर नोटीस पाठवून धनादेशातील रक्कमेची मागणी केली, परंतु आरोपीने रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादीने निगोशिएबल इंस्टुमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली असता आरोपीस नोटीस मिळूनही तो गैरहजर राहिल्याने त्यास अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले, परंतु पोलिसांनी ते वॉरंट बजावले नाही.

 

एवढेच नाही तर ते वॉरंट बजावले अथवा नाही बजावले यांचा कोणताही अहवाल न्यायालयात दाखल केला नाही. त्यामुळे फिर्यादीस न्याय मिळण्यास विलंब झाला व या गोष्टीस श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचे धरुन न्यायालयाने त्यांना संबंधित अजामीनपात्र वॉरंट का बजावले नाही? अशी कारणे दाखवा नोटीस (शोकॉज नोटीस) जारी करून न्यायालयात समक्ष हजर राहण्याचे आदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button