अहमदनगर ब्रेकींग: विद्युत महामंडळाच्या कनिष्ठ अभियंतास तिघांकडून मारहाण

अहमदनगर- रोहित्र बसविण्यासाठी गेलेल्या विद्युत महामंडळाच्या कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट (वय 40 रा. देहरे ता. नगर) यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. गुरूवारी सायंकाळी भोरवाडी (ता. नगर) शिवारात ही घटना घडली. मारहाणीत बराट जखमी झाले आहेत.
त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दीपक रंगनाथ भोर, संतोष बबन भोर, देवराम तुळशीराम माने (तिघे रा. भोरवाडी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दीपक भोर व देवराम माने यांना अटक केली आहे.
गुरूवारी सायंकाळी बराट व त्यांचे सहकारी भोरवाडी शिवारात तात्पुरते स्वरूपात बसविलेले 100 केव्हीए चे रोहित्र बदलून 63 केव्हीए हे रोहित्र बसविण्यासाठी गेले होते. त्यावेळी दीपक भोर, संतोष भोर व देवराम माने यांनी बराट यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल हिसकावून तो फोडला.
तसेच बराट यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांचा देखील मोबाईल हिसकावून घेत येथेच पेटवून देवू असे म्हणून बराट यांचा शर्ट व बनियन फाडून त्यांना मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.