अहमदनगर ब्रेकींग: व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी तरूणाचे अपहरण

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील अमोल पाटील यांचे 60 हजार रुपये व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी अपहरण करून नेले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिस्तूल लावून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपीस काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने जेरबंद केले. विशाल हरिश्चंद्र लाहुंडे (वय 27) असे त्याचे नाव आहे.
यातील एक आरोपी श्रीरामपूर येथील असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्यातून मिळाली. सदरचा आरोपी हा सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. 6, साईबाबा मंदिर जवळ राहणारा असून तो योगेश हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक़ राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व त्यांचे पथक पोलीस नाईक रघुवीर कारखेले, सोमनाथ गाडेकर, संतोष दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल रमिजराजा अत्तार, तुषार गायकवाड व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख यांनी योगेश हॉटेल परिसरात सापळा लावला.
रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास योगेश हॉटेल, डावखर रोड या परिसरात विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून एक तरुण आला. त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्या ठिकाणाहून गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या पथकातील पोलिसांनी स्मशानभूमी रोडवर त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने पकडले. त्याचे नाव विशाल हरिश्चंद्र लाहुंडे (वय 27) असे त्याने सांगितले. पोलिसांनी संपूर्ण खात्री करून या आरोपीस काल राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.