अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: दफनविधीसाठी खड्डा खोदण्यास विरोध; मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात

अहमदनगर- दफनविधीसाठी खड्डा खोदण्यास विरोध केल्याने मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवून मृतदेहाची अवहेलना केली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सुमारे 50 ते 60 इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना नेवासा बुद्रुक येथे घडली. येथील नारदमुनी मंदीर परिसरातील हिंदू-मुस्लीम वादाचा दावा न्यायप्रविष्ठ असल्याने प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केलेल्या जागेत एका मयताच्या दफनविधीसाठी खड्डा खोदण्यास विरोध केल्याने हा प्रकार घडला आहे.

 

दरम्यान काल दिवसभर वेगवेगळ्या अफवांमुळे नेवासा परिसरात तणावाचे वातावरण होते. सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे नेवासा येथे आले. त्यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालून हिंदू व मुस्लिम समाजातील लोकांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. मयताच्या नातेवाईकांना प्रशासनाने न्यायलायच्या आदेशाचा अर्थ समजून सांगितल्यानंतर त्यांना न्यायलायाचा निर्णय होऊ पर्यंत नेवासा बुद्रूक येथील गावठाणातच सर्वधर्मीय स्मशान भूमीत दफनविधी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. रात्री उशिरापर्यंत समाजबांधव व मयताच्या घरच्यांशी चर्चा अंती अहमदनगर येथे दफनविधी करण्याचे ठरले व उद्याच्या बंद नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल वसिम मुस्तफा इनामदार यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटलेे की, पाचेगाव बीट हद्दीतील नेवासा बुद्रूक येथील नारदमुनी मंदिरावरून हिंदू-मुस्लीम धर्मियांमध्ये वाद आहेत. याबाबतचा दावा वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे सुरू असून सदर दावा न्यायप्रविष्ठ आहे. सदर मंदिर परिसरात मुस्लीम धर्मियांची दफनभूमी आहे. परंतु सदर जागेबाबत दावा प्रलंबित असल्याने वक्फ बोर्डाने सदर ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केलेले आहे.

 

दि. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास सदर परिसरात मुस्लीम लोक खोदकाम करत असल्याचे समजल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, उपनिरीक्षक मनोज मोंढे, सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे, सहायक फौजदार श्री. साळवे आदी नारदमुनी मंदीर परिसरात गेले. तिथे खोदकाम करण्याचे काम सुरु होते.

 

त्याचवेळी नेवासा बुद्रूक येथील मनोज हापसे, गणेश गायकवाड, प्रकाश सोनटक्के, ज्ञानेश्वर कुटे आदी लोक आले. त्यांनी या जागेबाबत दावा सुरु असून प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे सांगितले. मयत इसमाबाबत चौकशी करता त्याचे नाव बाबुलाल नबाब देशमुख रा. नेवासा बुद्रूक असल्याचे समजले.

 

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सदर ठिकाणी प्रभारी तहसीलदार श्री. सानप, गटविकास अधिकारी श्री. दिघे, ग्रामसेविका अनुसया उन्हाळे, कामगार तलाठी श्री. चव्हाण आदींना बोलावून घेतले. प्रभारी तहसीलदार श्री. सानप यांनी मुस्लीम समाजाच्या लोकांना सदर जागेबाबत दावा सुरु असून प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केलेले असल्याचे सांगितले, परंतु मयताचे नातेवाईक आम्ही याच ठिकाणी दफनविधी करणार आहोत असे सांगत होते. ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

 

अखेर मयताचे नातेवाईक जुम्माखान पठाण, याकूब नवाब देशमुख, शब्बीर महंमद पठाण, आसिफ पठाण, अब्बास बागवान, इम्रान दारुवाला, सलिम शेख, जुबेर मनियार, इरफान शरीफ शेख, शोएब पठाण, नसिर बाबुलाल पठाण, जाकीर शेख, इकबाल देशमुख, इमरान बागवान, राजमहंमद हसन पठाण, अल्ताफ पठाण, सलिम बाबुलाल पठाण, कदीर शेख, मुस्ताक शेख, तैनुर शेख व इतर 50 ते 60 इसम यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सदर मयत बाबुलाल नबाब देशमुख यांचा मृतदेह नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात नेवून ठेवून मृतदेहाची अप्रतिष्ठा केली.

 

त्यानंतर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी मयताच्या नातेवाईकांना समजावून सांगून अंत्यविधी करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्यास नकार देवून सदरचा मृतदेह नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवून निघून गेले.

 

या फिर्यादीवरुन वरील 21 जणांसह अन्य 50 ते 60 इसम यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 143, 149, 188, 297 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button