अहमदनगर ब्रेकींग: वेश्या व्यवसायावर छापा; अल्पवयीन मुलीची सुटका

अहमदनगर – शहर पोलिसांनी सावेडी उपनगरातील सूर्यानगर परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला. दोन महिलांसह व्यवसाय चालवणार्या एकास ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग व तोफखाना पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली. सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणार्या एका व्यक्तीसह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. चार ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.