अहमदनगर ब्रेकींग: कत्तलखान्यावर छापा; 3800 किलो गोमांस पकडले

अहमदनगर- झेंडीगेट परिसरात वारंवार छापेमारी करूनही येथील कत्तलखाने बंद होत नाही. पुन्हा कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. या प्रकरणी ओळखीच्या दोघांसह अनोळखी चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथून सात लाख 60 हजार रूपये किमतीचे तीन हजार 800 किलो गोमांस व चार हजार रूपये किमतीचे दोन वासरे असा सात लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अब्दुल हक कुरेशी व निहाल कुरेशी (दोघे रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. परि. पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री पावणे आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. झेंडीगेट येथे आर.आर. बेकरीचे समोर व्यापारी मोहल्ला येथे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.
त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, परि. पोलीस उपनिरीक्षक मुगडे, पोलीस अंमलदार डी. पी. बोरूडे, सलीम शेख, सुमित गवळी, दीपक कैतके, अभय कदम यांच्या पथकाने बातमीतील नमूद ठिकाणी रात्री पावणे आठ वाजता छापा टाकला असता त्याठिकाणी असणारे कत्तलखान्याचे मालक व कामगार पळून गेले.
पोलिसांनी माहिती काढली असता सदरचा कत्तलखाना निहाल कुरेशी व अब्दुल हक कुरेशी यांचा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तीन हजार 800 किलो गोमांस, दोन जिवंत वासरे असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सदरची कारवाई केली.