अहमदनगर ब्रेकींग: अजित पवार यांना इशारा देणारे ज्येष्ठ शेतकरी नेते पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला होता. पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले आहे.
अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असतांना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अजित पवार यांचे आज सकाळी अकोले तालुक्यात आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी ते अकोले तालुक्यातील माणिकओझर येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते.
शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारार्थ अकोलेजवळील विठ्ठल लॉन्स येथील आयोजित सभेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी पवार यांना इशारा दिला होता.
मी अजित पवार यांना सभेच्या व्यासपिठावर शांततेच्या मार्गाने जाऊन भेटणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी मी त्यांना भेटलो होतो तेव्हा अजित पवार यांनी मला मााघार घ्यावी म्हणून विनंती केली होती. ती विनंती मान्य करताना मी पवार यांना गायकरांना तुम्ही आता पवित्र करुन घेताय पण अगस्ति कारखाना निवडणूकीवेळी तुमच्या पॅनलचे गायकर नेतृत्व तर नाहीच पण ते उमेदवार सुध्दा असता कामा नये अशी अट सावंत यांनी त्यांना घातली होती.
तेव्हा त्यांनी कारखाना निवडणूकीवेळी एकत्र बसून निर्णय करु असे अजितदादांनी सांगितले तर अजितदादांनी मी जिल्हा बँकेच्या वेळी माघार का घेतली हे आजच्या सभेत सांगावे तसेच विधानसभा निवडणूकीच्यावेळी अकोलेकरांना जो शब्द दिला होता. 21 ला मतदान करा, 21 नंतर मी …फेडतो, असे म्हटले होते त्याचे काय झाले? ते तर राहिले बाजुला पण अजित पवार हे त्यांच्या पॅनलच्या प्रचाराला अकोल्यात आले आहेत, याचा खुलासा करावा यासाठी त्यांना मी भेटणार आहे.असे श्री सावंत यांनी यापूर्वी जाहीर केले होते.