अहमदनगर ब्रेकींग: सहा जणांच्या टोळीचा सशस्त्र धुमाकूळ; 15 तोळे लुटले

अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी, पावबाकी शिवारात सहा जणांच्या टोळीने सशस्त्र धुमाकूळ घातला. तीन घरे फोडून 15 तोळे सोन्याच्या दागिन्यासह दीड लाख रुपये असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना पहाटे घडली.
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे. दरोड्याच्या या घटनेमुळे शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात सहा दरोडेखोरांनी सुकेवाडी गावचे उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर दरोडा टाकला. या दरोडेखोरांनी चाकू, लोखंडी टामी, पाईप अशा शस्त्रांचा धाक दाखविला. दरोडेखोरांनी शेजारील इतर घरांचे दरवाजे बाहेरून बंद करीत लुटमार केली. या दरोड्यामध्ये तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले.
या दरोड्यामध्ये दरोडेखोरांनी सुभाष कुटे यांच्या घराशेजारील घरांना बाहेरून कड्या लावल्या. यानंतर त्यांनी उत्तमराव कुटे यांच्या घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी कुटे यांच्या मानेला चाकू लावून सोन्याचे दागिने व रोख रक्कम देण्यास सांगितले. या दरोडेखोरांनी कुटे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडील दहा तोळ्यांहून अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास सव्वा लाखांची रक्कम लुटली.
दरोडेखोरांनी महिला व मुलांच्या अंगावरील दागिनेही ओरबाडून घेतले. यावेळी आरडा ओरड झाल्याने परिसरातील नागरीकही जागे झाले. मात्र दरोडेखोरांनी सगळ्यांच्या घराला बाहेरून कड्या लावल्याने कोणालाही मदतीसाठी येता आले नाही. जवळपास अर्धातास या वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरु होता. चोरट्यांनी लष्करात सेवेला असलेल्या दातीर या जवानाच्या घरावरही दरोडा घातला. चोरट्याने एका वयस्कर महिलेच्या घरातील पैसेही चोरून नेले.
सुनील नाईकवाडी यांच्या घरावरही दरोडा घालून सोन्याचे दागिने व रोकड लुटून नेली. जवळपास अर्धातास सुरु असलेल्या या प्रकारानंतर दरोडेखोर पसार झाले.