अहमदनगर ब्रेकींग: दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघे जखमी; तीन लाखांचा ऐवज लुटला

अहमदनगर- अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तसेच घरातील दोघांना मारहाण करत घरातील सोन्या चांदीची दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील वाघ वस्ती येथे काल ही घटना घडली.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील वाघ वस्तीवर निखिल बाबासाहेब वाघ यांच्या घराच्या किचनचे दरवाजाचा कडी-कोयंडा कटावनीने तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून बेडरूममध्ये प्रवेश केला.
यावेळी शुभम वाघ व करण वाघ या दोघांबरोबर झटापट करून या दोघांना मारहाण केली. तसेच घरातील कपाटाचे लॉक तोडले. तसेच कपाटातील लॉकरचे लॉक तोडून त्यातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात निखिल बाबासाहेब वाघ यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम 394, 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.