अहमदनगर ब्रेकींग: चारीत ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा मृत्यू; आईसह बाळ बचावले

अहमदनगर- चारीत ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात दोघा ऊसतोड कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात आईसह लहान बाळ बचावले. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील अशोकनगर चौकी जवळील राऊतवस्तीवर ही घटना घडली.
रात्रीच्या वेळी ह घटना घडली. मात्र अंधारात घटना घडल्याने लवकर कुणाच्या लक्षात आले नाही. स्थानिक शेतकरी उमेश राऊत यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु ट्रॅक्टर हा पूर्णपणे जखमीच्या अंगावर असल्यामुळे त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. अशोक कारखाना प्रशासनाला घटनेची माहिती दिली असता एक जेसीबी तेथे आला. परंतु जेसीबी अचानक नादुरुस्त झाला. त्यानंतर अशोकनगर फाटा येथून क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर चारीतून वर काढण्यात आला. कारखान्याच्या काही अंतरावर असताना सुद्धा तात्काळ मदत मिळू शकली नाही.
या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेल्या मजूर परिवारातील दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृताचे नाव अमोल बागुल व रविना बागुल असल्याचे समजते. यामध्ये मयत अमोल बागुल यांची पत्नी सपना बागुल व त्यांचे तान्हे बाळ हे देखील जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, पोलीस नाईक शरद अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, प्रविण कांबळे यांच्या पथकाने अपघातग्रस्तांना तात्काळ सहकार्य केले. परिसरात वारंवार अपघात होत असताना वाहतूक करताना रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे कुठलीही जीवित हानी होणार नाही.
ऊसतोड कामगारांच्या बाबतीतच अशी घटना घडत असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टरखाली जागीच मृत्यू झाला होता. यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.