अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ट्रक- कंटेनरच्या भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर – नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास (ता. नगर) चौकात रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.

 

औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ४३ वाय ७७४०) पाठीमागून कंटेनरने (एमएच १२ जेएस ९१९९) जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. हा अपघात शेंडी बायपास चौकात घडला असून, धडक दिलेल्या कंटेनरमध्ये लोखंडी सळ्या होत्या. त्या केबिनमध्ये घुसल्याने कंटेनरमधील कृष्णा रघुनाथ सानप (वय २५, रा. रामनगर, ता. गेवराई, जि. बीड) व एका अज्ञात इसमाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

 

चौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी संभाजी खलाटे जखमी झाल्याची माहिती मिळाली. वाहतूक बंदोबस्तासाठी असणारे पोलिसांनी तत्परता दाखवत बाजूला गेल्याने ते बचावले.

 

शेंडी बायपास चौकात अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात बहिरवाडी येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन करत येथे सिग्नल व इतर उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

 

अपघातानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button