अहमदनगर ब्रेकींग: हत्याराने वार करून युवकाचा खून

अहमदनगर- नागापूर परिसरात आढळून आलेल्या विजय भगवान कुर्हाडे (वय 22 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) या तरूणाच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर बुधवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी नागापूर परिसरातील काकासाहेब म्हस्के रोडवर विजयचा मृतदेह आढळून आला होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान विजयचा मृत्यू लाथाबुक्क्यांनी व हत्याराने केलेल्या मारहाणीतून झालाचा डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यावरून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दादा ऊर्फ प्रतिक चंद्रकांत कांबळे (रा. नागापूर) व भागेश ऊर्फ गोट्या मधुकर नाकाडे (रा. आदर्शनगर, बोल्हेगाव फाटा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गोरख भगवान कुर्हाडे यांनी फिर्याद दिली आहे.
10 डिसेंबर, 2022 रोजी रात्री नागापूर येथील हॉटेल चैतन्य क्लासिक येथे विजय कुर्हाडे व आरोपींमध्ये वाद झाले होते. या वादातून विजयला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व हत्याराने मारहाण केली आहे. यावरून आरोपींविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.