अकोलेअहमदनगरताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात या’ तारखेला काजवा महोत्सव, काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल तर वाचाच ही बातमी | Bhandardara Kajwa Festival

Bhandardara Kajwa Festival :- रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समून दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. जून महिन्यात अनेक ठिकाणी ‘काजवा महोत्सव’ सुरू होतात. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

तुम्हालाही शहराच्या प्रकाश आणि प्रदूषणापासून दूर जाऊन काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल तर या उत्सवाचा एक भाग व्हा आणि येथे कॅम्पिंगपासून ट्रेकिंगपर्यंतच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. या ठिकाणी तुम्हाला काजव्यांचा हळूवार आणि तालबद्ध वावर पाहायला मिळणार आहे. हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडू लागतात आणि याच काळात त्यांची संततीही वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे काही ठिकाणी काजव्यांची संख्या कमी होत आहे. परंतु राज्यातील या काही ठिकाणी अजूनही काजवे मोठ्या संखेने पाहायला मिळतात

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने 3 व 4 जून 2023 रोजी भंडारदरा जवळील पांजरे गावामध्ये काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी केले आहे.

काजवा महोत्सवामध्ये येणार्‍या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकांसोबत काजवे पाहण्याची संधी मिळणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आनंद घेता येणार आहे. जे पर्यटक भंडारदरायेथे मुक्काम करू इच्छितात त्यांचे साठी सशुल्क टेंट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच या महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. या मध्ये भंडारदरा परिसरामध्ये विशेष करुन घेतल्या जाणार्‍या काळा भात व विविध भरड धन्य यांची विक्री तसेच त्यापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ देखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांनी बनवलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

काजवे पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांनी आपली वाहने वाहनतळावर लावावीत व तेथून चालत जाऊन काजवे पाहावेत. झाडांच्या जवळ वाहने लाऊ नये. काजवे पाहतांना बॅटरीचा वापर फक्त रस्ता पाहण्यासाठी करावा. झाडावर बॅटरीचा प्रकाशझोत फिरवू नये. काजवे पाहतांना मोबाईल अथवा कॅमेराचा फ्लॅश चमकवू नये.

तसेच गाडीच्या लाईटचा प्रखर प्रकाशझोत काजवा असलेल्या झाडावर टाकू नये. काजवे असलेल्या झाडांपासून किमान 50 फुट अंतर राखावे. गोंगाटामुळे काजवे उडून जाण्याची शक्यता असल्याने परिसरात मोठ्याने आवाज करु नये, गाणी लावू नयेत, तसेच गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजवू नये.

काजवा हा अतिशय संवेदनशील कीटक असल्याने व मे व जून हा काजव्याचा प्रजनन काळ असल्यामुळे, येणार्‍या पर्यटकांनी अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा काजव्यांवर विपरीत परिणाम होऊन काजव्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याचा धोका संभवतो. अशी पथ्ये काजवे पाहतांना पर्यटकांनी बाळगणे आवश्यक आहेत, असे आवाहनही श्रीमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

 

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button