अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कारची पाच जणांना धडक; दोन ठार, तीन जखमी

अहमदनगर – रस्त्यावर एका भरधाव स्विफ्ट कारने पाच जणांना उडविले. त्यात, दोन जण ठार झाले. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काल शुक्रवारी (दि. ८) रात्री सातेसात वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे (ता. राहुरी) येथे माळवाडी शिवारात हा भीषण अपघात झाला.

संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय ३२), कैलास छबुराव पंडित (वय ४५, दोघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी मृतांची नावे आहेत. सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड, बादशहा शेख (तिघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी जखमींची नांवे आहेत

शनिशिंगणापूरच्या दिशेने स्विफ्ट कार भरधाव वेगाने चालली होती. मोलमजुरी करुन उपजिविका करणारे सुरेश ससाणे रस्त्याने पायी चालले होते. त्यांना कारने जोरदार धडक दिली. कार चालकाने जखमीला मदत न करता भरधाव वेगाने कार शनिशिंगणापूरच्या दिशेने नेली. पुढे एक किलोमीटर अंतरावर दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली

बांधकाम मजुरी करणारे चार जण दुचाकींवर होते. घटनेची माहीती समजताच स्थानिक तरुण सुभाष वैरागर, लालासाहेब वैरागर व इतरांनी मदकार्य केले. दोन रुग्णवाहिकांमधून सर्वांना नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, भरधाव कारने पुढे एका ओढ्यावरील पुलाला धडक दिली. त्यामुळे, कार तेथेच सोडून कारमधील लोकांनी पलायन केले. कारमधील तीन जण पळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

 

राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नगर येथे रुग्णालयात हलविलेले गंभीर जखमी दोन जण उपचारादरम्यान मयत झाले. तीन गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button