अहमदनगर ब्रेकींग: स्विफ्ट कार-मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू

अहमदनगर – स्विफ्ट कार व मालवाहतूक ट्रक यांचा भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाला नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. नगर सोलापूर महामार्गावर मांदळी (ता. कर्जत) नजीक हा अपघात झाला.
मृतांमध्ये शरद शोभाचंद पिसाळ (32 वर्ष), निळकंठ रावसाहेब माने (34 वर्ष) व धर्मराज लिंबाजी सकट (27 वर्ष) (सर्व राहणार थेरगाव. तालुका-कर्जत) या तीन युवकांचा समावेश आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
तालुक्यातील थेरगाव येथील चार तरुण घोगरगाव येथून चारचाकी वाहनाने गावाकडे येत असताना मांदळी नजीक हा भीषण अपघात झाला. मिरजगावच्या दिशेने जाणारी कार (एम एच ०४ डि एन ३३४१) अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकच्या (टी एन २८एएम ३३४२) पुढील चाकाच्या बाजूला व रस्ता दुभाजकावर जोरदार आदळली आहे. हा अपघात इतका भयानक होता की कार गाडीचे इंजिन बाजूला फेकले गेलेले आहे. अपघातानंतर तरुणही बाहेर फेकले गेले होते असे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे तात्काळ घटनास्थळी पोलिस पथक घेवून दाखल झाले.
मृतांना कर्जत येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाता नंतर नगर सोलापूर महामार्गावर अपघात झालेल्या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. ती पोलीस विभागाने दूर केली. अपघातानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते अशी माहिती सह्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.