अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील ‘या’ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा अपहार

अहमदनगर- राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठितांनी स्थापन केलेेल्या राजमाता जिजाऊ पतसंस्थेत 7 कोटी 37 लाखांचा 65 हजार 78 रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक करून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात काल सोमवारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, वसुली अधिकारी, दैनिक बचत प्रतिनिधी, कॅशियर, तत्कालीन लेखापरीक्षक अशा अशा एकूण नऊ जणांवर लेखापरीक्षकाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठितांनी स्थापन केलेेल्या या पतसंस्थेवर शासकीय, शिक्षक, वैद्यकीय व पत्रकार क्षेत्रातील प्रतिष्ठित पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ठेवीदारांनी आपल्या ठेवीसाठी अनेक आंदोलने करून पतसंस्थेची शासकीय लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार शासकीय लेखापरीक्षण होऊन त्यांच्या निरिक्षणातून पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्याहत्तर रुपये अफारातफर झाल्याचे अहवालात नमुद केले होते.
याप्रकरणी लेखापरीक्षकांनी महिन्यापूर्वीच याबाबत फिर्याद दिली होती. मात्र, अपहाराची रक्कम मोठी असल्याने वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मंजुरीनंतर काल दि. 14 नोव्हेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुरीचे सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक संजय पांडू धनवडे यांनी फिर्यादित म्हटले की, दि. 1 एप्रिल 2016 ते दि. 31 मार्च 2021 पर्यंत राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेशी निगडीत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक,वसुली आधिकारी, दैनिक बचत प्रतिनिधी, कॅशियर, तत्कालीन लेखापरीक्षक यांनी संगनमताने संस्थेचा विश्वासघात करून सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्याहत्तर रूपये इतक्या निधीचा अपहार केला आहे.
धनवडे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे व्यवस्थापक कारभारी बापुसाहेब फाटक रा. टाकळीमिया, ता. राहुरी, संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब तुकाराम येवले रा. राहुरी, नांदूर रोड, ता. राहुरी, उपाध्यक्ष शरदराव लक्ष्मण निमसे रा.सह्याद्री नर्सरी, नगर मनमाड रोड, अस्तगाव माथा, ता. राहाता, लेखनिक तथा वसुली अधिकारी तथा दैनिक बचत प्रतिनिधी सुनील नारायण भोंगळ रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी, लेखनिक तथा कॉम्प्युटर ऑपरेटर उत्तम दत्तात्रय तारडे रा. केंदळ बु., ता. राहुरी, लेखनिक तथा कॅशिअर श्रीमती सुरेखा संदीप सांगळे रा. प्रगती विद्यालयाजवळ, नीळा झेंडा चौक, राहुरी, तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक सुरेश मंजाबापू पवार रा. जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी, तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक दत्तात्रय विठ्ठल बोंबले, रा. दिपज्योत सह्याद्री पब्लिक स्कुलजवळ, राधामोहन नगर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर, तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक दीपक संपतराव बंगाळ रा. साई प्लाझा, कुंदन पेट्रोल पंपाजवळ, राहाता, ता. राहता अशा नऊ जणांवर गु र .रजि नं.- 1155/2022 भा.द.वि. कलम 409, 420, 465, 477(अ), 34 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहे.