अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा उपनिबंधकांच्या नावे साडेतीन लाखांची लाच मागणारा पकडला

जिल्हा उपनिबंधक यांच्या नावाने चार लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती साडेतीन लाख रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना खासगी इसम महेश गोविंद महांडुळे (वय 42 मुळ रा. रूईखेल ता. श्रीगोंदा, हल्ली रा. सारसनगर, अहमदनगर) याला अहमदनगर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली.
त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील पुरूषाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
यानंतर आज शुक्रवार 22 एप्रिल रोजी अहमदनगर शहरातील महात्मा फुले चौक येथील एका गाळ्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदार यांनी त्यांचे गावातील भैरवनाथ विविध कार्यकारी सह. सोसायटीचे सचिव यांचे विरूध्द केलेल्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी सचिवास निलंबित केले होते.
सचिवास निलंबनातून मुक्त न करता सेवतुन बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांचेशी ओळख आहे, असे सांगून त्यांच्या नावाने महांडुळे याने तक्रारदार यांच्याकडे चार लाख रूपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 21 एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणीमध्ये महांडुळे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे चार लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती साडेतीन लाख रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
त्यावरून काल 22 एप्रिल रोजी नगर शहरातील महात्मा फुले चौकात एका गाळ्यामध्ये आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाईदरम्यान साडेतीन लाख रूपये लाच स्विकारताना महांडुळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.