अहमदनगर ब्रेकींग: झिंगलेल्या ग्रामसेवकाचा बैठकीत धिंगाणा

अहमदनगर- पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या बोलावलेल्या शासकीय आढावा बैठकीत मद्यप्राशन करुन आलेल्या एका ग्रामसेवकाने चांगलाच धिंगाणा घालत गटविकास अधिकार्यांनाही अरेरावी केली. पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात असलेल्या मिटींग हॉलमध्ये हा प्रकार घडला.
याबाबत गटविकास अधिकारी किशोर प्रकाश माने (रा.लोणी हवेली रोड, पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामसेवक संजय महादू मते (रा.पारनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर माने हे पारनेर पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि.२८) त्यांनी पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची शासकीय आढावा बैठक पंचायत समिती कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये बोलावलेली होती. ही बैठक सुरू असताना दुपारी २.३० च्या सुमारास ग्रामसेवक संजय मते हा दारू पिऊन मिटींग हॉलमध्ये आला व त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत बेशिस्तपणाचे वर्तन केले.
तसेच गटविकास अधिकारी माने यांच्या दिशेने धावून जात त्यांना एकेरी भाषेत मिटींग बंद कर, आम्हाला कोणत्याही कामाचा आदेश तू द्यायचा नाही, तू बाहेरुन आलेला आहे. तुझ्याकडे पाहून घेतो असे मोठमोठ्याने ओरडून गैरवर्तन केले. तसेच शासकीय कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करुन शासकीय मिटींगमध्ये येवून अडथळा निर्माण केला.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी ग्रामसेवक संजय मतेविरुद्ध भा.दं.वि.क. १८६, १८९, मुंबई पोलिस कायदा कलम ८५ (१) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.