अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: चिकूच्या बागेत तरूणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर- रस्त्याच्या बाजूला चिकूच्या बागेमध्ये काल संध्याकाळी पाच वाजेदरम्यान मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी-पोहेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित इसमाचा मृत्यू कसा झाला या चर्चेला उधाण आले होते.

 

याबाबत समजलेली माहिती अशी की, काल पाच वाजता सोनेवाडी येथील रहिवासी असलेला इसम नारायण हरिभाऊ जावळे( वय 31 वर्ष) याचा मृतदेह पोहेगांव सोनेवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नवले यांच्या चिकुच्या शेतात आढळून आला. जनावरांसाठी गवत घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती जावळे यांच्या आई-वडिलांना दिली.

 

घटनास्थळी मृताची आई गुफाबाई जावळे व वडील हरिभाऊ जावळे आले त्यांनी हा मृत देह आपल्या मुलाचाच असल्याचे ओळखले. मृत्यू कसा झाला याबाबत मात्र त्यांनाही शंका आली. पोलीस पाटील दगु गुडघे यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.

 

पोलीस उपनिरीक्षक सुरेश आव्हाड व महेश कुसारे यांनी मृत व्यक्ती संदर्भात माहिती घेतली. मृत्यू झालेल्या व्यक्तीकडे दोन दिवसापासून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये असल्याची चर्चा परिसरात केली जात होती. या गोष्टीला त्याच्या आई-वडिलांनीही दुजोरा दिला आहे. रुग्णवाहिकेतून नारायण जावळे यांचा मृत देह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन व जाब जबाबाचे काम चालू होते.

 

शवविच्छेदानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. रात्री अकरा सोनेवाडी येथे नारायण जावळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button