अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा पोलीस दलात पुन्हा लाचखोरी; पोलिसावर गुन्हा

अहमदनगर- काल नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात लाचेप्रकरणी एका पोलिसांवर कारवाई झाल्यानंतर आज पुन्हा 50 हजार रूपये लाचेची मागणी करून 40 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी पोलीस हवालदाराविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय जनार्धन बडे (वय 52 रा. वामननगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शेवगाव येथे नेमणुकीस आहे.
आज नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. बाभुळगाव (ता. पाथर्डी) येथील तक्रारदार व त्यांचे मित्र यांच्यात भागीदारीमध्ये जेसीबी आहे. त्या जेसीबीने अवैधरित्या मुरूम उत्खनन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी व जेसीबी जप्त न करण्यासाठी बडे याने तक्रारदारांकडे 50 हजार रूपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून 13 जुलै, 2022 रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये बडे याने तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 40 हजार रूपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून बडे विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.