अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कंपनीत केमिकल्सच्या टाकीचा स्फोट होऊन चौघे…

अहमदनगर- कंपनीमध्ये वेल्डिंग काम सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथे असलेल्या भांगे ऑर्गेनिक प्रा.लि.कंपनीमध्ये घडली.

 

जखमींवर नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढिल उपचारार्थ नगर येथे हलविण्यात आले आहे. एका माजी मंत्र्यांच्या पत्नीच्या नावे कंपनीने खडका फाटा येथे भाडेतत्वावर घेतलेल्या कंपनीमध्ये ज्वालाग्रही पदार्थाची निर्मिती होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कंपनीत सुरू असलेल्या वेल्डिंग कामामुळे अचानक केमिकल्सच्या टाकीचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले.

 

या जखमींना गावकर्‍यांनी तातडीने नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत करून नेवासा पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेमध्ये चौघे जण जखमी झालेले असून एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली.

 

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी जखमींवर प्राथमिक उपचार सुरू असताना भेट दिली. त्यानंतर जखमींना पुढील उपचारार्थ नगरला हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.

 

इथाईल अ‍ॅसीटेट बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स इथेनॉल, अ‍ॅसेटीक अ‍ॅसिड, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, बॉयलर इंधन, दगडी कोळसा, जळणाचे लाकूड, बॉयलरमध्ये गरम करण्यासाठी थरमिनॉल रसायनचा साठा या कंपनीत असतो. ज्वालाग्रही पदार्थांची या कंपनीत निर्मिती होत असताना व वेल्डिंग काम सुरु असतानाही याकडे लक्ष न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button