अहमदनगर ब्रेकींग: ग्राहकाने केला कंपनी मालकावर टोकदार वस्तूने हल्ला

अहमदनगर- थकीत पैशांची मागणी केल्याने ग्राहकाने कंपनी मालकावर टोकदार वस्तूने हल्ला केला. केडगाव औद्योगिक वसाहतीमधील विजय हिंग सप्लायर कंपनीमध्ये ही घटना घडली. संदीप किसन नानेकर (वय 47, रा. नांदेड सिटी, पुणे) हे जखमी झाले आहेत. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेश विजय चंगेडिया (रा. अहमदनगर) याच्याविरूध्द गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानेकर यांची शिवणे (पुणे) येथे सिध्दकला इंटरप्रायजेस नावाची प्लास्टीक इंजेक्शन आणि ब्लो मोल्डींग उत्पादनाची कंपनी आहे. महेश विजय चंगेडिया हा 2018 पासून नगर येथे विजय हिंग नावाची कंपनी चालवतो. या कंपनीसाठी प्लॉस्टीकच्या डब्या पुरविण्याचे काम संदीप नानेकर करत होते. नानेकर यांनी दिलेल्या प्लॉस्टीकच्या डब्यांची थकबाकी वाढल्याने त्यांनी नवीन डब्या देण्याचे काम बंद केले.
नानेकर हे थकीत रक्कम वसुलीसाठी गुरूवारी स्कोडा (एमएम 12 एचएन 2516) मधून आले. त्यांच्यासमवेत या व्यवहारात मध्यस्थी असलेले अमोलचंद खेमणसरा, तसेच महेशचे मामा मदन आणि साडू प्रशांत मोहन आढाव हे आले. त्यांनी थकीत पैशांची मागणी केली असता, महेशने टोकदार वस्तूने संदीप नानेकर यांच्या डोक्यात तसेच छातीवर वार केले. पुन्हा पैसे मागितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
नानेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक कासार पुढील तपास करीत आहेत.