अहमदनगर ब्रेकींग: टोळक्याकडून माजी नगरसेवकाला मारहाण

अहमदनगर- आज दुपारी नगर शहरातील टिळक रस्त्यावर माजी नगरसेवक संजय झिंजे यांना 10 ते 11 जणांनी मारहाण केली. यासंदर्भात झिंजे यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणारे संशयीत सुरज सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, अर्जुन जज्जर, ऋषीकेश ऊर्फ भय्या डहाळे, सोनू संतोष दगडे व इतर पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
झिंजे हे त्यांचे मित्र माजी नगरसेवक अंबादास पंधाडे यांच्या पुतण्याच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी नवीन टिळक रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयात गेले होते. तेथे दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास सुरज सुभाष जाधव याने झिंजे यांनी त्याच्याविरूध्द पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जाचा राग मनात धरून झिंजे यांना मंगल कार्यालयाच्या बाहेर ओढत नेऊन त्याच्या साथीदारांसह मारहाण केली. पुन्हा तू आमच्या वाट्याला गेल्यास तर तुला कायमचा संपवून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मित्राबरोबर दुचाकीवरून जात असताना जुन्या वादातून संजय झिंजे यांच्यासह सात ते आठ जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद सचिन संतोष दगडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.
आयुर्वेद कॉर्नर जवळ संजय झिंजे, अनिकेत झिंजे, ललित झिंजे (सर्व रा.चितळेरोड) यांच्यासह इतर पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकी अडवून आमच्या नादाला कशाला लागले, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.