अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अडचणीत वाढ; ‘ही’ माहिती आली समोर

अहमदनगर – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याने राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे मंत्रिपद गेले आहे. मंत्रिपद जाताच ते अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. गौरी गडाख आत्महत्या प्रकरणात शंकरराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनीता गडाख यांच्यावर खुुनाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, सोमवारी सोनई येथे होणार्‍या मेळाव्यात गडाख याबाबत काही बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शंकरराव गडाख यांचे धाकटे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी 7 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणावरून माजी मंत्री गडाख यांच्यावर सातत्याने आरोप झाले. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी दाखल रिट याचिकेवर 21 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गौरी गडाख आत्महत्या प्रकरणात सत्यता लपवण्यात आली आहे. आरोपी हे उच्चवर्गीय असून ते आत्महत्या प्रकरणाची सत्यता बाहेर येऊ देत नाही. त्यामुळे या घटनेचे वास्तव समोर येणेे गरजेचे आहे. गडाख कुटुंबात वाद होते. त्यामुळे या घटनेमागे कटाची शक्यता आहे. गौरी गडाख यांचा मृत्यू नगर येथे झाला व पोस्टमार्टम औरंगाबाद येथे झाले.परंतु त्याचा अहवाल प्रसिद्ध केला नाही. पोस्टमार्टम अहवालातील परिच्छेद 17, तसेच 18 व 23 मध्ये जखमांचा उल्लेख आहे. यावरून ही आत्महत्या नव्हे तर थंड डोक्याने केलेला खून आहे असे दिसते, असे या अर्जात म्हटले आहे.

काही महिन्यापूर्वी नगर न्यायालयातही अर्ज करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, स्वर्गीय गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 2020 रोजी झाला, अशा बातम्या माध्यमातून आल्या. त्यांच्या मृत्यू संशयास्पद आहे. गौरी या घरातील सर्व गोष्टी बाहेर सांगत होत्या. त्याप्रमाणे त्यांनी असे सांगितले की, त्यांचे पती प्रशांत गडाख यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या बंधूना, शंकरराव गडाख यांना 50 कोटी रुपये उसने दिले होते. प्रशांत गडाख व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला जात होता.

मुळा एज्युकेशन सोसायटी व संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, असा आग्रह त्यांनी धरला होता. मुळा एज्युकेशन संस्थेत जास्त पैसा मिळत होता म्हणून यांना तिथे हिस्सा पाहिजे होता. गौरी व प्रशांत गडाख यांचा संसार गोडीगुलाबीने सुरू होता. उसने दिलेले 50 कोटी रुपये परत देण्यास नकार दिला, असे नगर न्यायालयात दिलेल्या अर्जात म्हटले होते. नगर न्यायालायाने हा अर्ज फेटाळला होता. दरम्यान सोनईत सोमवारी माजी मंत्री गडाख मेळावा घेत आहेत. ते काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

मंत्री असतानाही त्यांना कोंडीत पकडण्यासाठी स्थानिक राजकीय विरोधकांनी प्रयत्न केले होते. प्रतीक काळे प्रकरणातही त्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. आता औरंगाबाद खंडपीठात दाखल फौजदारी रिट याचिकेवर काय निर्णय होतो, याची उत्सुकता वाढली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, “न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. याबाबत मी काहीही बोलणार नाही. सोमवारी, 11 जुलै रोजी सोनई येथे मेळावा घेणार आहे. जनतेच्या दरबारातच सर्व गोष्टी मांडणार आहे”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button