अहमदनगर ब्रेकींग: प्रसिध्द हॉटेल मालकाकडून महावितरणच्या अभियंत्याकडे खंडणीची मागणी

पांढरीपुल येथील हॉटेल लेमन ट्रीचे मालक गोरक्ष शिवाजी शेटे (रा. शनिशिंगणापूर ता. नेवासा) यांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता किसन भिमराव कोपनर (वय 42 रा. शिलाविहार रोड, सावेडी) यांच्याकडे दोन लाख रूपये खंडणीची मागणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी उप कार्यकारी अभियंता कोपनर यांनी कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गोरक्ष शेटेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उप कार्यकारी अभियंता कोपनर यांच्याकडे अहमदनगर शहर क्षेत्र वगळता संपुर्ण नगर तालुका कार्यक्षेत्राची जबाबदारी आहे. तसेच वेगवेगळ्या सेक्शनचे अभियंता व कर्मचारी यांचे पथक बनवून विजचोरी बाबत कार्यक्षेत्रात तपासी करण्याचे काम कोपनर यांच्याकडे आहे.
6 ऑगस्ट, 2018 रोजी कोपनर यांच्या पथकाने जेऊर सेक्शन मधील खोसपुरी शिवारातील गोरक्ष शिवाजी शेटे यांचे मालकिचे लेमन ट्री हॉटेल येथे विज चोरी बाबत तपासणी केली असता ते विज चोरी करताना मिळुन आले होते.
त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यांनी 27 हजार 370 रूपये रोख स्वरूपात दंड भरला होता. त्यानंतर 3 जानेवारी, 2022 रोजी एक वायरमन व एका कंत्राटी कर्मचार्यावर लाचलुचपतची कारवाई झाली होती.
यात त्या कर्मचार्यांचे निलंबन झाले होते. या कारवाई नंतर त्याचा फायदा घेत गोरक्ष शेटे याने 29 जानेवारी, 2022 पासून कोपनर यांना वेळोवेळी फोन करून,‘दोन लाख रूपये द्यावेच लागतील नाही तर मी तुमच्या विरूध्द विनयभंग तसेच इतरांमार्फत अॅट्रोसिटी तसेच वेगवेगळे गुन्हे दाखल करीन’, अशी धमकी दिली.
त्यानंतर शेटे याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने कोपनर 7 मे, 2022 रोजी सदर अर्जाची चौकशी कामी कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते.
चौकशी झाल्यानंतर पोलीस ठाण्यातून घरी जात असताना दुपारी पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यावर गोरक्ष शेटे हा माझ्या जवळ आला व तुम्ही मला दोन लाख रूपये द्या, नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करीन अशी धमकी देवुन माझ्या जवळ दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याचे कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.