अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: एटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट

अहमदनगर- जिल्ह्यात यापूर्वी शिर्डी, संगमनेर येथे जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून एटीएम मशीन फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी रविवारी पहाटे जिलेटीन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून एटीएम मशीन फोडल्याची घटना जखणगाव (ता. नगर) शिवारातील कुंदन हॉटेलच्या शेजारी घडली.

 

या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरट्यांना खाली हाताने परत जावे लागले. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर तबाजी काळे (वय 31 रा. जखणगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

 

रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार चोरटे वाहनातून आले. त्यांनी कुंदन हॉटेलच्या शेजारी असलेले वक्रंगी कंपनीचे एटीएम मशीन बसवलेल्या गाळ्याचे कुलुप तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला.

 

एटीएम मशीनच्या खाली जिलेटीन कांड्या लावल्या. स्फोट घडवून एटीएम मशीन फोडले. दरम्यान या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरटे खाली हाताने परत गेले. जिलेटीन कांड्याचा वापर करून स्फोट केल्याने परिसरात आवाज झाला. यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

 

नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान चार चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये स्फोट केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button