अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ‘त्या’ पुरवठादाराच्या दुकानातून मोठा धान्यसाठा जप्त

अहमदनगर- रेशनचा अवैध धान्यसाठा 21 ऑक्टोबर रोजी भानसहिवरे येथे पकडण्यात आल्यानंतर सदर प्रकरणातील आरोपी असलेला सुरेश दगडू उभेदळ याच्या धान्य दुकानातील साठा मंगळवारी नगर येथील पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केला आहे. दरम्यान उभेदळ व त्याच्या साथीदारांवर यापूर्वी गुन्हा दाखल असल्याने ते पसार झाले आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, 21 ऑक्टोबर रोजी भानसहिवरा येथे रेशनचा बेकायदा गहू व तांदळाचा साठा पकडून देण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल झाला. आरोपीचे दुकान तेव्हापासून बंद होते.

 

या दुकानात जावून नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगरचे पुरवठा विभागाचे तहसीलदार अभिजीत वांढेकर यांच्यासह पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी काल मंगळवारी सुरेशनगर येथे जावून सदर आरोपीच्या दुकानातील धान्य साठ्याची पाहणी केली. पंचनामा करुन धान्य ताब्यात घेतले.

 

सदर धान्य वाहनांमध्ये भरुन पुरवठा विभागात जमा करण्यात आले. सदर धान्याची मोजणी करुन सदर दुकानदाराला दिलेला वार्षिक धान्य साठा व त्याने पॉस मशिनद्वारे प्रत्यक्षात रेशनकार्डधारकांना विकलेले धान्य याची पडताळणी केली जाणार असल्याचे पुरवठा विभागाचे तहसीलदार अभिजीत वांढेकर यांनी सांगितले. दरम्यान नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनीही सदर रेशन दुकानदाराकडील धान्य ताब्यात घेतले असून लोकांची गैरसोय होवू नये म्हणून येथे दुसर्‍या व्यक्तीकडे वितरणाकरीता धान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

 

ताब्यात घेतलेले धान्य व वितरीत केलेले धान्य याची पडताळणी केल्यावर काही तफावत दिसून येते का हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला ज़ाईल असे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button