अहमदनगर ब्रेकिंग : नगर अर्बनच्या घोटाळ्यात गांधी कुटुंबिय आरोपी….

नगर अर्बन मल्टीस्टेटशेड्युल्ड बँकेत घडलेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्यात बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे चिरंजीव व नगर मनपाचे भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी, तसेच या गांधी बंधूंची चुलती संगीता अनिल गांधी यांना आरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी आता येत्या 1 जूनला होणार आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या विद्यमान सत्ताधार्यांचे मार्गदर्शक मानले जाणारे सुवेंद्र गांधी यांना सस्पेन्स घोटाळ्यात आरोपी केल्याने बँकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अर्बन बँकेच्या सस्पेन्स खात्यातून 15 धनादेश वटवले गेले असून, यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहेत. बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेला पाच लाखांचा दंडही केलेला आहे.
या पार्श्वभूमीवर सस्पेन्स खात्यातील या गैरव्यवहारांबद्दल चौकशीची मागणी होत होती. त्यातून न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते.
मात्र, बँकेचे लेखा परीक्षण करणार्यांच्या सरतपासणीत गांधी परिवारातील सुरेंद्र व देवेंद्र गांधी या बंधूंचे व संगीता अनिल गांधी या त्यांच्या चुलतीचे नाव स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना आरोपी ठरवून समन्स बजावण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार या तिघांनाही समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या येत्या सुनावणीस त्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे. नगर येथील न्यायालयात केस नंबर 714/2016 मध्ये न्यायमूर्ती श्रीमती पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे समन्स बजावले आहेत