अहमदनगर ब्रेकींग: भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर- शेतकर्याकडून आठ हजाराची लाच घेणारा शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. प्रदीप शंकर महाशिकारे (वय 46) असे त्याचे नाव आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज कारवाई केली आहे.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील तक्रारदार यांनी त्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या अमरापूर शिवारातील शेत गट नं. 180 मधील 21 गुंठे जमिनीची भुमी अभिलेख कार्यालय, शेवगाव यांच्याकडून मोजणी करून घेतली होती. मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविन्यात आल्या होत्या. त्याचा सुधारित नकाशा देण्याकरिता यातील भूकर मापक प्रदीप महाशिकारे याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
10 हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून सोमवारी शेवगाव-ताजनापूर रोड वरील स्मशानभूमी जवळ आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान महाशिकारे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडुन आठ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.