अहमदनगर ब्रेकींग: वकिलास मारहाण करून गोळ्या घालण्याची धमकी

येथील न्यायालयात वकिलीचा व्यावसाय करणारे अॅड. वसीम गुलाब सय्यद (वय 40 रा. सर्जेपुरा, अहमदनगर) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गोळ्या घालुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
ही घटना अहमदनगर शहरातील सर्जेपुरा भागात घडली. या प्रकरणी अॅड. शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अजीम वजीर शेख (रा. बारातोटी कारंजा, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
अॅड. सय्यद हे अहमदनगर न्यायालयात वकिली करतात. त्यांचे कार्यालय सर्जेपुरा येथील हनुमान चेंबर्स येथे आहे. अॅड. सय्यद नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना तेथे त्यांच्या ओळखीचा अजीम शेख हा आला व अॅड. सय्यद यांना म्हणाला,‘ सन 2017 साली जी केस झाली होती त्यावेळी आम्ही तुम्हाला जे पैसे दिले होते ते मला परत द्या’,
त्यावेळी अॅड. सय्यद त्याला म्हणाले,‘ ते पैसे तु मला दिले नाही, ते पैसे दुसर्या इसमाने दिले आहेत, त्यामुळे मी तुला पैसे परत देणार नाही’, असे म्हणताच शेख याला राग आला.
त्याने अॅड. सय्यद यांना गोळ्या घालुन ठार मारण्याची धमकी दिली. झटापट करून शिवीगाळ केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथून निघुन गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.