अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई; ‘त्या’ विद्यार्थ्यांस केले जेरबंद

अहमदनगर- महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात छापे टाकून दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. विशिष्ट ट्विटर हँडलचा वापर करून मुख्यमंत्री आणि उपमहापौरांसह घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता तपासाअंती गणेश नारायण गोटे (वय 29) याला अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोटे हा पीएच.डी.चा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

14 ऑक्टोबर, 2022 रोजी महाराष्ट्र सायबरला एका तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाली की, एक व्यक्ती विशिष्ट ट्विटर हँडल वापरत होती आणि तो त्या ट्विटर हँडलचा वापर करून मुख्यमंत्री आणि उपमहापौरांसह घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट करत होता. तसेच ती व्यक्ती आपल्या ट्विटर हँडलचा वापर करून महिलांशी गैरवर्तन करत होती आणि काही महिला पत्रकारांनाही शिवीगाळ करत असल्याची ही तक्रार होती.

 

हा ट्विटर हँडल वापरकर्ता वायफाय/व्हीपीएन इत्यादी वापरण्यासारखी खबरदारी घेत होता. तो मुंबईतून सामग्री पोस्ट करत आहे, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.

 

तक्रार मिळाल्यानंतर महाराष्ट्र सायबरने तांत्रिक विलेश्षण केले असता ती व्यक्ती प्रत्यक्षात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून ते ट्विट करत असल्याचे आढळून आले. तांत्रिक पुष्टीकरणानंतर महाराष्ट्र सायबरच्या पथकाने 29 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे छापा टाकून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन मुंबईत आणले.

 

त्यातील गोटे याला तपासाअंती अटक करण्यात आली असून दुसर्‍या एकाकडे चौकशी सुरू आहे. दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींनी पोस्ट केलेला काही मजकूर या गुन्ह्यात आणखी काही जणांनी तयार केला असावा आणि या तपासासाठी जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप सायबर फॉरेन्सिककडे पाठवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button