अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर- नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे प्रवरा नदीच्या पात्रात घडली. पुनम किरण भोसले (वय 27) रा. कोल्हार खुर्द व आर्या किरण भोसले (वय 3 वर्षे )असे मृत्युमुखी पडलेल्या माय लेकींची नावे आहेत.

 

कोल्हार खुर्द सासरी असलेल्या पुनम किरण भोसले व आर्या या मायलेकी म्हाळादेवी या गावी माहेरी आपले वडील नारायण महादू संगारे यांचेकडे आल्या होत्या. गुरुवारी दुपारी पुनम व त्यांची मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमी लगत असलेल्या म्हाळादेवी येथील धोबी घाटावर गेल्या होत्या.

 

वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरी नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. धोबी घाटावर या मायलेकींच्या चपला व धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले. गावकऱ्यांनी शोधले असता पाण्यातून पुनम यांचा मृतदेह गुरुवारी रात्री बाहेर काढण्यात आला. आर्याचा पोलिस व नागरिकांनी पाण्यात रात्रभर शोध घेतला.

 

अखेर सकाळी प्रवरा नदीच्या पात्रात आर्यांचा मृतदेह तब्बल 14 तासाने आढळून आला. म्हाळादेवी गावचे पोलीस पाटील अशोक कचरू संगारे यांचे खबर दिल्यावरुन अकोले पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

तर पुनम किरण भोसले व आर्या किरण भोसले या मायलेकी च्या मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर शुक्रवारी दुपारी डॉ. सुरेखा पोपरे व डॉ. राहुल कवडे यांनी मायलेकी च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोल्हार येथे मयत पूनम च्या सासरी आज शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुदैवी घटनेबद्दल म्हाळादेवी व कोल्हार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button