अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : वनविभाग जलसंधारण कामात लाखोंचा घोटाळा ! आमदार लंके म्हणाले…

जिल्हास्तरीय बिगर आदीवासी योजनेअंतर्गत वनविभागामार्फत पारनेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वनक्षेत्रातील मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत गॅबियन बंधारे व मातीनाल बांध या कामांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 1 कोटी 22 लाख 42 हजार 117 रुपये इतकी रक्कम नगरचे उपवनसंरक्षक यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती.

यात पारनेर वन क्षेत्रातील मौजे सुपे, वाळवणे, रूईछत्रपती, पळवे बुद्रुक तसेच इतर गावांमध्ये योजना राबवण्याचे उदिष्ठ होते.

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या तक्रारीत आ. लंके यांनी नमुद केले आहे की, मातीनाला बांध व गॅबियन बंधायांची कामे शासन नियमानुसार योग्य ती प्रक्रिया करून त्याबाबतच्या निविदा प्रसिध्द करणे गरजेचे होते.

परंतू तसे न करता सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच अतिरिक्त कार्यभार असलेले वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी संगनमताने, कसल्याही प्रकारची नियमानुसार कार्यवाही न करता पदाचा गैरवापर करून खोट्या निविदा काढून परस्पर कामांचे वाटप केले.

गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले आहेत, त्या मजुरांच्या नावावर मजुरी आदा न करता खोट्या मजुरांची नावे वापरून रोखा लेखा तयार करण्यात आला.

त्यावर वनरक्षक व वनपालांच्या स्वाक्षर्‍या न घेता उपवनसंरक्षक अहमदनगर यांच्या कार्यालयास सादर करण्यात आले. माती नाला बांध कामाच्या बी 1 निविदा प्रक्रियेमध्ये वनरक्षक, वनपाल यांना सहभागी न करता, त्यांना विश्वासात न घेता परस्पर कामांचे वाटप करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सुपे येथील वनपरिमंडळ अधिकारी एस. एस. भोसले यांनीच या निधीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार आमदार नीलेश लंके यांच्याकडे केली आहे. तक्रारदार एस. एस. भोसले यांच्या जिवितास धोका झाल्यास,

त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला गेल्यास सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांना जबाबदार धरण्यात यावे असे नमुद करतानाच देवखीळे यांच्याविरोधात यापूर्वीही आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली असल्याचे लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button