अहमदनगर ब्रेकींग: नाशिकच्या पथकाला नगरमध्ये सापडले गुटख्याचे घबाड

अहमदनगर – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या पथकाने नगर शहरात काल सायंकाळी मोठी कारवाई केली. विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार त्यांच्या पथकाने व पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
दिल्लीगेट परिसरातून पोलिसांनी सुमारे साडेनऊ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. कारवाईत गुटख्यासह एकूण १६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवर्ती व कायम रहदारी असलेल्या दिल्लीगेट परिसरातील एका पार्किंगमध्ये लावलेल्या दोन टेम्पोमध्ये गुटखा असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना मिळाली होती. त्यांनी उपअधीक्षक कातकाडे यांना विशेष पथकासह संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून दोन्ही टेम्पो ताब्यात घेतले.
एका टेम्पोतून दुसऱ्या टेम्पोत गुटखा भरण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत मालाची तपासणी केली. यात हिरा, विमल कंपनीचा सुमारे ९ लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा व ७ लाख रुपयांची दोन वाहने असा एकूण १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उपअधीक्षक कातकाडे, पोलिस हवालदार शकील शेख, पोना हेमंत खंडागळे, पोना सचिन जाधव आदींनी ही कारवाई केली.