अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: प्रेमविवाह केल्याचा राग; सासरकडील लोकांकडून तरूणावर वार

अहमदनगर- आपल्या मुलीसोबत केलेल्या प्रेमविवाहमुळे घराची बरबादी झाल्याचा राग मनात धरून मुलीकडील लोकांनी विवाहित तरूणाला मारहाण करत सत्तुरने वार केल्याची घटना नगर शहरातील कापडबाजारात घडली. गणेश मारूती कासार (वय 26 रा. कल्याण रोड) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

गणेशच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वसंत मुरलीधर गोंधळी, राम मुरलीधर गोंधळी, सुरज वसंत गोंधळी, निशांत वसंत गोंधळी (सर्व रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

गणेश कासार यांनी वसंत गोंधळी यांच्या मुलीसोबत 20 जुलै, 2020 रोजी प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यापासून मुलीचे वडिल वसंत, चुलते राम व भाऊ सुरज, निशांत यांचा गणेशवर राग होता.

 

शुक्रवारी रात्री गणेश व त्यांचे मित्र गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी वसंत, राम, सुरज व निशांत हे तेथे आले.‘याने आपल्या घराची बरबादी केली आहे, याला सोडू नका’ असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

निशांतने हातातील सत्तुरने गणेशच्या पाठीवर तीन वार करून जखमी केले. ‘तुला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून ते तेथून निघून गेले असल्याचे गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button