अहमदनगर ब्रेकींग: रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या जामिनावर झाला निर्णय

बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
मागील वर्षी जातेगाव (ता. पारनेर) घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बोठे याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती.
अनेक दिवसांपासून बोठे अटकेत असून मध्यंतरी त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने बोठेच्यावतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर सरकारी व आरोपी पक्षाचा सुमारे एक महिन्यापूर्वीच युक्तीवाद पूर्ण झाला होता. जामिन अर्जावरील निर्णय खंडपीठाने राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देण्यात आला आहे. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून आरोपी बोठेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.