अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: सैराट फेम ‘प्रिन्स’ पोलिसांच्या रडारवर; कारण…

अहमदनगर- नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत होती. पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान सैराट चित्रपटात ‘प्रिन्स’ ची भूमिका साकारलेला सुरज पवार याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा यामध्ये वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

या बाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना तीन सप्टेंबर रोजी श्रीरंग अरुण कुलकर्णी या नावाने भ्रमणध्वनी आला. त्याने मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. कोरोना काळात सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर नोकरी लावून देण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. मोबाईलवर शैक्षणिक कागदपत्रे मागीतली.

 

शुक्रवारी वाघडकर यांना राहुरी बस स्थानक येथे बोलावून लिपिक टंकलेखक पदाचे नियुक्तीपत्र दाखविले. दोन लाख रुपये घेतले. नियुक्तीपत्र देण्यासाठी आणखी तीन लाखांची मागणी करून, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे व्हीआयपी अतिथीगृहात बोलविले. वाघडकर यांना संशय आल्याने, त्यांनी मंत्रालयात चौकशी केली. फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले.

 

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शुक्रवारी कृषी विद्यापीठ येथे दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (३१, रा.दत्तनगर,मालेगाव बसस्थानक,नाशिक) याला अटक केली. त्याच्याकडून बनावट शिक्के, नियुक्तीपत्रं, काही कागदपत्रे जप्त केली. त्याने कुलकर्णी या खोट्या आडनावाने फोन केल्याची कबुली दिली. त्याला, राहुरी न्यायालयाने उद्या शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासाची चक्रे वेगाने फिरली.

 

अटक आरोपीचा साथीदार आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) याला राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यालाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. त्याने बनावट शिक्के तयार करून घेतले. नियुक्तीपत्रावर सह्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिक्के बनवून दिलेला आरोपी ओंकार नंदकुमार तरटे (रा. संगमनेर) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याने सामाजिक न्याय विभागाचा गोल व आडवा शिक्का बनवून दिल्याची कबुली दिली.

 

आरोपी तरटे याने चौकशीत “शिक्के बनवून देत नव्हतो. परंतु, आरोपी शिंदे याने शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी शिक्के वापरणार असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका केलेला सुरज पवार आला होता. पवारने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून देतो. असे सांगून एका व्यक्तीशी बोलणे करून दिले. शिक्क्यांचा गैरवापर करणार नसल्याचे सांगितल्याने शिक्के बनवून दिले.” असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button