अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे-ठाकरे गट आमनेसामने आले अन्…

अहमदनगर- शहरात 12 मानाचे गणपती आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत या 12 गणपतींनंतर कोणती मंडळे सहभागी होतील यावर पोलिस प्रशासन निर्णय घेतात. मानाच्या गणपती नंतर 14व्या स्थानावर शिवसेना सहभागी होते. मात्र राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना कोणती यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील गणेश विसर्जन मिरवणुकीतील शिवसेनेच्या सहभागावर शिंदे व ठाकरे गट अशा दोन्ही गटांनी दावा केला होता. त्यामुळे यंदाची मिरवणूक वादात राहणार याची चर्चा होती.

 

काल (शुक्रवारी) स्थानावरून शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात वाद झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र मिरवणुकीतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात झालेल्या कुरघोड्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

काल (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजता रामचंद्र खुंट परिसरातून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. पहिले मानाचे 12 गणेश मंडळे झाल्यावर 13व्या क्रमांकावर शिवसेनेतील ठाकरे गटाला सहभागी करण्यात आले. तर शिंदे गटाला नवीन सहभाग म्हणून सर्वात शेवटी स्थान देण्यात आले होते.

 

मिरवणूक आडते बाजार परिसरात येताच शिंदे गटाने आपला गणपती व डिजेचा ट्रॅक्टर 12 मानाच्या गणपतींनंतर घुसविला. त्यामुळे ठाकरे गटाच्या आधी शिंदे गटाचा डिजे दणदणाट करू लागला. त्यामुळे शिंदे गट व ठाकरे गटात वाद सुरू होणार तोच पोलिसांना दोन्ही गटांच्या मध्ये सुरक्षा कवच उभे करत वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. आडते बाजारातून ही मिरवणूक डाळ मंडईत दाखल झाली. मात्र त्याच वेळी शिवसेनेनेही आपला डाव टाकला.

 

 

मानाच्या गणपतीतील शेवटची तीन गणेश मंडळेंपैकी दोन गणेश मंडळे ही शिवसेना नगरसेवकांची आहेत. यात समझोता गणेश मंडळ शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम व नगरसेविका सुरेखा कदम यांचे आहे. तर निलकमल गणेश मंडळ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे आहे. या मंडळांनी जागेवर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाच्या डिजे पुढे ठाकरे गटाची दोन मंडळे व मागे ठाकरे गटाचा डिजे अशी स्थिती निर्माण झाली. दोन तास ही गणेश मंडळे एकाच जागी उभी होती. अखेर शिंदे गटाने मागे जाण्याचा निर्णय घेतल्यावर समझोता व निलकमल गणेश मंडळे पुढे गेले आणि वादावर पडदा पडला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button