अहमदनगर ब्रेकिंग : बंदी असूनही वैदू जात पंचायतीचा धक्कादायक निर्णय

लोणी येथील एका तरुणाला त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा होता. त्यासाठी तो वैदू जात पंचायतीकडे गेला. पंचायतीची बैठक झाली. त्यामध्ये एकतर्फी घटस्फोट मंजूर करण्यात आला आणि फोन करून मुलीला कळविण्यात आला.
तिला नुकसानभरपाई म्हणून केवळ एक रुपया पंचांकडे जमा करण्यात आला. असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेला धीर देत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी साथ दिली.
सिन्नर येथील एका मुलीचे लोणी (जि. नगर) येथील मुलाशी लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिया छळ सुरू केला. त्यामुळे ती माहेरी सिन्नरला परत गेली.
याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जात पंचायतीला हाताशी धरून तिला घटस्फोट दिला आणि फोन करून तिला निर्णय कळविला. त्यानंतर त्या तरुणाने दुसरे लग्नही केले. आता ती विवाहिता अंनिसच्या मदतीने याविरोधात कायदेशीर लढा देणार आहे.