अहमदनगर ब्रेकींग: खोट्या सह्या करून शिक्षकांनी पळविला शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव

अहमदनगर- येथील नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेजमधील शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या रजिस्टरला खोटी सही करून परस्पर ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी संस्थेतील नोकरीस असलेले शिक्षक सय्यद असीफ करीम (रा. मुकुंदनगर) व शेख रियाज रफिक (रा. झेंडीगेट) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी रेहान शफीअहमद काझी (वय 43 रा. रामचंद्रखुंट) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या संस्थेतील शेख नजमुसहेर अब्दुल रहमान या 31 ऑगस्ट, 2022 रोजी शिक्षक पदावरून सेवानिवृत्त होणार होत्या. त्यामुळे सदर रिक्त होणार्या पदासाठी संस्थेने 23 ऑगस्ट, 2022 रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केली होती. रिक्त पदावर संस्था संचालक मंडळाने खान जमजम जियाउर रहेमान यांची निवड करून त्यांना नेमणुक पत्र देण्यात आले होते. त्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविला होता.
त्यानंतर सदर प्रस्तावाबाबत शिक्षणाधिकारी यांनी त्रुटी दाखवुन प्रस्ताव माघारी पाठविला. त्यानंतर त्यांनी दाखविलेल्या त्रुटींची पुर्तता करून प्रस्ताव पुन्हा फेरतपासणी करता पाठविला होता.
त्यानंतर प्रस्तावाची फेरछाननी करून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाकडुन सदर प्रस्तावातील त्रुटी बाबत फिर्यादी यांना संपर्क करून प्रस्ताव घेवुन जावुन त्यातील त्रुटींची पुर्तता करण्याबाबत कळविण्यात आले होते. फिर्यादीला काम असल्यामुळे ते दोन दिवस शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात जावु शकले नाही. त्यानंतर दोन दिवसांनी निवड झालेल्या शिक्षक खान जमजम जिया अहमद व त्याचे पती मोहसिन रज्जाक शेख असे दोघेही शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव आणण्याकरिता गेले होते. तेव्हा येथील शिपाई अरूण भोगाडे यांनी सांगितले की, तुमचा शाळेचा प्रस्ताव रेहान काझी नामक व्यक्तीने आमचेकडुन रजिस्टरला सही करून स्वतः घेवुन गेले आहे.
परंतु सदरचा प्रस्ताव मी आणलेला नसल्याचे फिर्यादी यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर संस्थेचे मोहसिन शेख यांनी त्यांचे मोबाईलमधील संस्थेत कामास असलेले शिक्षकांचे फोटो तेथील शिपाई भोगाडे यांना दाखविले तेव्हा त्यांनी दोन इसमाचे फोटो ओळखले व ते संस्थेतील नोकरीस असलेले शिक्षक सय्यद असीफ करीम (रा. मुकुंदनगर) व शेख रियाज रफिक (रा. झेंडीगेट) असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, आम्हांला याबाबत काही एक माहित नाही, असे त्यांनी सांगितले.
त्या दोघांनीही फिर्यादी यांची जनरल सेक्रेटरी नागोरी मुस्लीम मिसगर जमाअत ट्रस्ट अहमदनगर या नावाने शिक्षण विभागाच्या रजिस्टरला खोटी सही करून संस्थेने पाठविलेला प्रस्ताव त्यांचे ताब्यात घेवुन जावुन संस्थेत जमा न करता त्यांचे स्व:तचे ताब्यात ठेवून फसवणुक केली आहे. सदरच्या प्रस्तावात सर्व मुळ दस्ताऐवज आहेत. म्हणून सय्यद असीफ करीम व शेख रियाज रफिक या दोन शिक्षकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.