अहमदनगर ब्रेकींग: यात्रेतील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

अहमदनगर- पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील गैबीच्या यात्रेत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली. तसेच यात्रेत धिंगाणा घालणार्याला पोलीस स्टेशनला घेऊन येत असतांना दोन महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.
याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पागोरी पिंपळगाव येथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस गैबीची यात्रा सुरू आहे. गुरुवारी रात्री मारुती मंदिर समोर यात्रेनिमित्त आर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. सहाय्यक फौजदार लक्ष्मण पवार, के.के.कराड, ए. बी. बडे, अल्ताफ शेख, एकनाथ बुधवंत, अमोल शिवाजी कर्डीले हे सर्व पोलीस कर्मचारी यात्रा बंदोबस्तावर होते.
रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्पाक अकबर शेख हा तिथे आला व मी गावचा दादा आहे. आर्केस्ट्रा बंद करा तुम्ही कोणाला विचारून गाणे लावले असे म्हणत गोंधळ घालू लागला. पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याला समजावून सांगत असताना शेख यांने पोलिसांची गचांडी धरत धक्काबुक्की केली. शिवीगाळा करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला असता शेख याची बहीण राईसा शेख (पुर्ण नाव माहिती नाही) व चुलती मुन्नाबी शेख (पुर्ण नाव माहिती नाही) तसेच इतर दोन ते तीन लोकांनी पोलीसांबरोबर झटापट करत शेखला पोलीसांच्या ताब्यातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
गाडीचे समोर आडवे बसून रस्ता अडवला. याबाबत अमोल कर्डिले यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.