अहमदनगर ब्रेकींग: चोरटे जिन्यामधून घरात शिरले; महिलेचा गळा दाबला आणि…

पहाटेच्या वेळी घराच्या छतावरील जिन्यामधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरामध्ये झोपलेल्या महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा 43 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात पवार वस्तीवर आज (गुरूवार) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीता अजित पवार (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील जिन्यामधून घरात प्रवेश केला. फिर्यादीचा गळा दाबला व दीड तोळ्यांचे दागिने हिसकावून घेतले. तसेच फिर्यादीच्या पतीच्या खिशातील नऊ हजारांची रोख रक्कम, मोबाईल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत.