अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: टोमॅटो व्यापार्‍याला 29 लाखांचा गंडा

अहमदनगर- संगमनेरातील टोमॅटो व्यापार्‍याची तब्बल 29 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुजरात येथील व्यापार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे व्यापारी भाऊसाहेब शंकर मेहत्रे (रा. निंबाळे, ता. संगमनेर) हे गुजरात व इतर राज्यातील व्यापार्‍यांना टोमॅटो विक्री करत असतात. मेहेत्रे यांनी गुजरात मधील व्यापारी अल्पेशकुमार नानजी मंडोरा यांना मागील वर्षी टोमॅटो विक्री केली होती.

 

मात्र या मालाच्या रकमेपैकी गुजरातच्या व्यापार्‍याने 22 लाख 36 हजार 663 रुपयांची रक्कम मेहत्रे यांना दिली नाही. ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

 

त्यानंतर मेहेत्रे यांनी तेथील दुसरे व्यापारी योगेशकुमार पिराजी सोळंकी यांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा या व्यापार्‍याला 6 लाख 50 हजार 936 रुपयांच्या टोमॅटोची विक्री केली. त्यामुळे मेहेत्रे यांची थकबाकी 29 लाख रुपये झाली.

 

भाऊसाहेब मेहेत्रे यांनी गुजरातच्या व्यापार्‍याकडे 29 लाख रुपये देण्याची मागणी केली मात्र पैसे देण्यासाठी या व्यापार्‍याने टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहेत्रे यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली.

 

यानंतर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी गुजरात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्रव्यवहार केला. पैशाची वारंवार मागणी करूनही गुजरातच्या व्यापार्‍याने पैसे न दिल्याने संतापलेल्या संगमनेरच्या व्यापार्‍याने उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केली.

 

या फसवणुकीबाबत भाऊसाहेब शंकर मेहेत्रे (वय 50, रा. निंबाळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अल्पेशकुमार नानजी मंडोरा (रा. थरा, ता. डिसा, जि. बनासकांता) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 986/2022 भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.जाणे पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button