अहमदनगर ब्रेकींग: दोन गट भिडले ; वेळीत पोलीस पोहचले नसते तर…

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर शहरातील पीरशहा खुंट येथे सोमवारी रात्री घडली. कोतवाली पोलीस वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे फौजफाट्यासह दाखल झाले होते.
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पीरशहा खुंट येथील एका केशकर्तनालयाच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून हे भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या ठिकाणी जमावाने वाहनांची तोडफोड केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. केशकर्तनालयच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली.
यानंतर येथे मोठा जमाव जमला. दोन्ही बाजूंनी तरुणांचा मोठा जमाव जमल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मात्र घटनेची खबर कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच आम्ही तेथे गेलो. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस फिर्यादी होत गुन्हा दाखल केला जाणार आहे. – संपत शिंदे (पोलीस निरीक्षक, कोतवाली)