अहमदनगर ब्रेकींग: चार तरूणांकडून दोन तरूणींवर अत्याचार

अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात कामानिमित्ताने आलेल्या कुटुंबातील दोन तरुणींवर तीन ते चार तरुणांनी अत्याचार केला. यातील एका तरुणीला उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दुसरी पीडित तरुणी पालकासह बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे हा गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात उदरनिर्वाहासाठी आलेल्या परजिल्ह्यातील कुटुंबातील दोन तरुणींचे तीन ते चार तरुणांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अपहरण करून त्यांच्यावर आळीपाळीने अत्याचार करत रात्रीच्या सुमारास त्यांना गावात आणून सोडले. त्यातील एका तरुणीला त्रास झाल्याने तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.
दुसर्या पीडित तरुणीने वडिलांना घेऊन याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर काहीच तक्रार नसल्याचा जबाब घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे.
यासंदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोत्रे यांना विचारले असता ते म्हणाले, एक मुलगी आणि तिची बहीण एका ठिकाणी गेले होते. तेथून एक मुलगी घरी गेली पण दुसरी मुलगी घरी जाण्यास नकार देत होती. नंतर एका मुलाच्या वडिलांनी तिला नगरला नेऊन सोडले. या कुटुंबाने जर तक्रार दिली असती तर घेतली असती. यासंदर्भात संबंधितांचा जबाब घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.