अहमदनगर ब्रेकींग: एक हजार घेताना वायरमन लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर- नव्याने सुरु केलेल्या बेकरी दुकानात मीटर लावून देण्याकरिता वायरमन धनंजय गोरख आग्रे याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आंग्रे याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी घडली.
राहाता तालुक्यातील राजुरी येथे तक्रारदार यांनी नव्याने बेकरी सुरू केलेली आहे. त्यासाठी त्यांनी व्यावसायिक वीज जोडणी घेतली आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले नवीन विद्युत मिटरसाठी अधिकृत कोटेशन व शुल्क भरले आहे. ते मीटर बसवून घेण्याकरिता धनंजय आग्रे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, पो. अंमलदार बाबासाहेब कराड, चालक पो. ह. हरुण शेख यांनी बुधवारी राजुरीत सापळा लावला.
आरोपीला तडजोडीअंती ठरलेली एक हजार रुपयांची लाच तक्रारदाराने दिली. त्याने ती स्विकारल्यानंतर सापळा लावलेल्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्यावर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.